पावसाच्या दडीमुळे पिके करपली ; आ. अब्दुल सत्तार यांनी बांधावर केली पाहणी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : पावसाने मोठ्या प्रमाणात दडी मारल्याने सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर दिला.

आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव, पालोद, शिवना, डीग्रस, पानवडोद, धोत्रा अजिंठा, अनाड तसेच सोयगाव तालुक्यातील सोयगाव, फर्दापूर, फर्दापूर तांडा, धनवट, जंगला तांडा गाव शिवाराची पाहणी केली. पावसाने दडी मारल्याने मका, कापूस, उडीद, मूग, सोयाबीन यासह विविध खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे.

 अनेक ठिकाणी पिके ऐन फुलोऱ्यात असताना पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पिके गुरांना चारण्यासाठी सोडून दिली आहेत. टोमॅटोचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मिरचीची पिके उपटून फेकून दिल्याचे या परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली. 

यावेळी आमदार सत्तार यांनी शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याने संवाद साधत, शेतकऱ्यांनी हताश होऊ नये, धीर धरावा. राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास दिला. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 

शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे असून, शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार सत्तार यांनी स्पष्ट केले. 

पाहणी दौऱ्यात तहसीलदार सागर वाघमारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड) भारत कासार (सोयगाव) शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जि. प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजूबाबा काळे, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, मुरलीधर काळे, नानासाहेब रहाटे, गणेश पाटील, प्रवीण मिरकर, सोयगाव न. प. तील शिवसेना गटनेता अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, राजू दुतोंडे, पालोद सरपंच नासेर पठाण, विनोद काटकर, पानवदोड सरपंच गजानन पन्हाळे, प्रमोद दौड, राजुमिया देशमुख, सय्यद कैसर, जीवनसिंग जाधव, इस्माईल कुरेशी, श्यामराव होळकर, सरपंच नाना दांडगे, तसेच कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र लांडगे, जोगेंद्र आहेरराव, मंडळ कृषी अधिकारी गणेश इंगळे, सहाय्यक कृषी अधिकारी मीनाक्षी ढाकरे आदीसह लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.